Thursday, 28 May 2020

मोकळा श्वास- लघुकथा


सौ.जया नेरे
                          नवापूर जि.नंदुरबार
                            9423918363

           मोकळा श्वास

एक-दोन दिवसांपासून संजीवनीला असं जाणवत होत की मिनू खूप उदास उदास राहतेय. नीट जेवत नाही की अभ्यासाला ही तिचे लक्ष लागत नाही.आपल्या रूममध्ये लोळत पडलेली असते.संजीवनीला वाटायचं की होईल व्यवस्थित दोन दिवसात.परंतु तिच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता.तिला आपल्या मुलीची चिंता वाटू लागली.का असं वागतेय मिनू.काय होत असेल हिला.संजीवनीने तिला जवळ बोलवले.तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.मांडीवर बसविले व हळूवार तिला विचारले ,अग मिनू,तुला काय होतयं बाळा,का एवढी उदास असतेस,नीट जेवत ही नाही की अलिकडे तू पुस्तक ही उघडले नाही.सांगशील का बच्चू आपल्या आईला.मिनूने आईचे शब्द ऐकले आणि तिला रडूच कोसळले.साठवलेले अश्रू घळघळ वाहू लागले. आईच्या कुशीत मनसोक्त रडून झाल्यावर मिनू हळूहळू आईला सांगू लागली.सांगतांना कसे सांगावे या संभ्रमात ती होती.
मिनू म्हणाली,आई ऐक ना ,मला का असं होतयं,काय झाल असेल गं मला,मी जिवंत राहिल ना गं. मिनूचे बोलणे ऐकून संजीवनी जास्तच घाबरली.काय झालं असेल माझ्या मिनूला.
संजीवनीने मिनूला छातीशी घट्ट धरले व तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाहणारचं ना आईला मुलांच्या डोळ्यातील अश्रू जास्त कमजोर करतात.
अगं मिनू सांग तरी तुला काय होतयं.
आई ,मला ना लघवीच्या जागेतून रक्त येतयं,मी आता मरणारचं आहे बघ.माझं पोट ही खूप दुखतयं ग आई,कंबर तर तुटेलच असं वाटतयं. खरचं मी मरणार आहे ना आई,सांग ना गं !
संजीवनीला आता हायसं वाटलं की मिनूला काही सिरियस झाले नाही.
संजीवनीने मिनूला सांगितले अग मिनू एकदा हस बरं.अग वेडी तुला काही झालं नाहीये.अगं असं प्रत्येक मुलीला वयात आल्यानंतर होत असतं.
मिनूने लगेच विचारले,'अगं आई,मुलगी वयात येणं म्हणजे काय असतं गं,सांग ना.
संजीवनीने तिला समजेल अशा भाषेत सांगितले की मुलगी १२-१३ वर्षाची झाली की तिला असा त्रास होतो तेव्हा मुलीचे वयात येणे म्हणतात.म्हणजे स्री मध्ये जी मुख्य लक्षणं हवीत ते म्हणजे मासिक पाळी सुरू होणे,तुला जो त्रास आता होतोय ना त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
बघ मिनू तुला आठवतं का आजी तुम्हाला म्हणायची आई जवळ जावू नका तिला कावळा शिवलायं. अगं मिनू,ते कावळा शिवणे होते ना,तेव्हा मला ही असाच त्रास होत होता. त्या काळी मुलांशी वा इतरांशी या बाबत मोकळेपणे बोलले जात नव्हते.आणि या काळात स्रिला कशाला ही शिवू देत नव्हते.पण बाळा आता हे सगळं बदललयं, तशी परिस्थिती आता राहिली नाही.
आणि हो गं माझचं चुकलं ,कामाच्या धावपळीत तुला याबाबत सांगायचे राहुन गेले,नाही तर तू घाबरले नसते.संजीवनीला तिची ही चुक चटकन लक्षात आली की आपण जर आधीच मिनूला सर्व माहिती सांगितली असती तर मिनूला असा शॉक बसला नसता.
संजीवनीने ठरवलं की मिनूला याबाबतीत सर्व माहिती द्यायची.
एके दिवशी दोघं मायलेकी फिरायला निघाल्या व रस्त्यात संजीवनीने मिनूला मासिक पाळी चक्र कसे सुरू असते या विषयी माहिती सांगितली. आणि अशा वेळी कशी काळजी घ्यायची,आहार काय घ्यायचा,आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची,यातून धोके काय आहेत.तसेच पॕडचा वापर कसा करायचा व स्वच्छता कशी ठेवायची या बाबतीत सखोल माहिती दिली.
हे सर्व ऐकून मिनूच्या मनावर जे ओझे होते ते कमी झाले.ती मोकळेपणाने राहू लागली.प्रत्येक गोष्ट ती आपल्या आईशी शेअर करू लागली.त्या दोघींच्या हे लक्षात आले नाही की कधी त्या जिवलग मैत्रीणी झाल्या. मिनू या सर्व गोष्टी आपल्या मैत्रिणींशी शेअर करू लागली.
एक दिवशी संजीवनी मिनूच्या शाळेत गेली,तेथील शिक्षिकांशी संजीवनी या बाबत सविस्तर बोलली.शिक्षिकांच्या ही बाब गंभीर आहे व या विषयावर आपण मार्गदर्शन पर तासिकेचे नियोजन केले पाहिजे हे लक्षात आले,त्यांनी शाळेत महिला मेळाव्या सह किशोरींचा मेळावा घेतला त्यात लेडीज डॉक्टरांना आमंत्रित केले.डॉक्टरांनी  किशोरींना मासिक पाळी,आरोग्य,स्वच्छता,आहार या बाबत स्क्रीनवर पी.पी.टी.च्या साह्याने मार्गदर्शन केले.महिलांनाही त्यांच्या आरोग्यविषयक सवयी जाणून घेवून मार्गदर्शन केले.
सर्व किशोरी त्यानंतर फुलू लागल्या ,डुलू लागल्या,फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद वावरु लागल्या,मोकळा श्वास घेऊ लागल्या.


सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Thursday, 14 May 2020

कविता- शंभूराजे

शंभूराजे

असे दणकट पिळदार शरीर
रूप त्यांचे देखणे रूबाबदार
शिवबाचा असे वीर पूत्र....हो जी

१४ मे १६५७ साली
गर्दी पुरंदर किल्ल्यावर दिसली
सईच्या उदरी राजबिंडा जन्मला...हो जी

होते शंभू तयाचे नाव
गोळा झाला तिथे सारा गाव
झाले कौतुक सा-यांना हो...जी

राही शिवरायांच्या सोबती
पाहिली डोळ्यांनी राजनिती
जाणली सारीच युद्धनिती हो...जी

बालपणीच मातृविना झाला पोरका
दाटला सर्वांना हुंदका
केली दुधाची उधारी हो...जी

केला जिजाऊंनी संस्कार
घडविला शिवबा परी शंभू बाळ
जुळवली स्वराज्याची नाळ हो...जी

शंभूराजे होते साहित्यिक
साहित्याचे त्यांना भारी कौतिक
संस्कृत भाषेचे उत्तम जाणकार हो...जी

अनेक ग्रंथांचे केले लेखन
कैक भाषांची होती जाण
विद्याविशारदचा होता बहुमान हो...जी

स्वभावाने होता निर्मळ
बसली स्वकियांच्या फितूरीची झळ
शत्रूने साधला त्यांच्यावर डाव हो....जी

रणागणांत होता शेर
जरब होती त्याची सर्वदूर
नाव ऐकताच शत्रू कापे थरथर

असा कुशलयोद्धा,परक्रमी राजा
अजेय वीर,छावा,धर्मवीर हो...जी
नमन स्वराज्यरक्षणकर्त्याला हो..जी

सौ.जया नेरे
नवापूर



Wednesday, 6 May 2020

बालकविता- नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी
आला मला कंटाळा
मुलांनी गजबजलेली
आठवते मला शाळा

अंक आणि अक्षरांचा
भरलेला तो फळा
पुस्तकांच्या संगतीने
लागे वाचनाचा लळा

काळ्याशार फळ्यावर
पांढऱ्या खडूची संगत
मधल्या सुटीत बसलेली
आठवतेय मला पंगत

घंटेची ती किणकिण
प्रार्थनेची सुंदर धुन
ऐकाविशी वाटतेय मला
ती गाण्यांची गुणगुण

कधीपासून मित्रांसोबत
रंगला नाही खेळ
करमेच ना त्याशिवाय
जात नाही वेळ

बाईच्या प्रेमाला आज
झालो आम्ही पारखे
शाबासकीने पाठीवर
हात फिरवायच्या सारखे

डोळा चुकवून सर्वांचा
शाळेत जाऊन यावे
वाटे एकदा तरी तिला
डोळेभरून पहावे

सौ.जया नेरे
नवापूर

Thursday, 30 April 2020

बालगीत- देवबाप्पा

देवबाप्पा

देवबाप्पा का रे
एवढा नाराज?
खेळायला कसा
येत नाही आज?

नको नको बाबा
घरातच राहू
कोरोनाशी लढा
आपणही देवू

शाळेलाही सुट्टी
नाही अभ्यासाला
घरीच बसून
शिकू दोघ चला

सारे सांगतायं
हात स्वच्छ धुवा
बाहेर जातांना
तुम्ही मास्क लावा

देवबाप्पा दे तू
कोरोनाशी लढा
असेल का रे तो
तुझ्याहून चढा?

कोरोना संपव
घरी जाता जाता
लॉकडाऊनने
कंटाळलो आता

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार






Friday, 24 April 2020

बालकविता- झोका


झोका
झोका जाई वरवर
वारा येई भरभर
चल ताई आपण
झोका झोका खेळू
छान छान गाणे
वा-यासंगे बोलू
आळीपाळी दोघं
झोक्यावर बसू
वर जाता झोका
येते मला हसू
गूं गूं होते कसे
पोटामध्ये माझ्या
गुदगुल्या होताच
येई मला मजा
आंब्याच्या वाडीत
बांधलाय झोका
झाडावरील पक्षी
मारतोय हाका
काऊ आणि चिऊ
सारे तेथे जमले
त्यांच्या सोबत कसे
खेळण्यात रमले
सौ.जया नेरे

Thursday, 23 April 2020

कविता- वाचवू वसुंधरेला

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिना निमित्त-
वाचवू वसुंधरेला

सौंदर्य वसुंधरेचे खुलविण्या
वृक्ष,वेली यांचे करू रक्षण
वाताहात होईल स्वतःची
जर होईल झाडांचेच भक्षण

स्वच्छ,निर्मळ,शुद्ध हवा
गरज आहे तिची प्रत्येक देहा
प्रदुषणाचा होतोय भडिमार
कृत्रिमतेचा सहारा घेतोय पहा

नसेल वृक्ष प्रत्येक घरीदारी
तर घ्यावी लागेल श्वासाची उधारी
सिमेंटचे  हे जंगल वाढवून
मानवा स्वतःचा आहे तूच शिकारी

वसुंधरे दिनी करू संकल्प सारे
एक झाड लावू जगवू त्याला
वसुंधरेला वाचवण्याचा हा
समजेल मुलमंत्र ज्याला


सौ.जया नेरे

बालकविता- वेडा आंबा

वेडा आंबा
आंब्याच्या झाडावर
होते आंबे सात
त्यातील एकाशी कुणी
करत नव्हते बात

एकटाच बसायचा
एकटाच खेळायचा
इकडे नि तिकडे
एकटाच पळायचा

स्वभावाने वेंधळा
होता जरा बावळा
सर्वांमध्ये होता तो
थोडाफार वेगळा

रंग नाही रूप नाही
होता वेडा वाकडा
डोळे होते तिरळे
होता जरा जाडा

एकदा झाडावरच
लागला तो रडायला
कुणीतरी दगडाने
लागले पाडायला

राजू म्हणत होता
आईबाबा जरा थांबा
आवडला होता त्याला
वेडा तोच आंबा

वेडा आंबा आज होता
खूपच खुशीत
कारण जावून बसला तो
राजूच्या कुशीत

सौ.जया नेरे