Tuesday 17 September 2019

काव्य रचना- द्रोण रचना


द्रोणरचना

ऋतू आला वसंत
मोहर आंब्याचा
    बहरलीत
    वृक्ष,वेली
     रानात
      कशी
       ती

कोवळी ती पालवी
   लाल नी तांबूस
      कुठे हिरवी
        मुलायम
         पहावी
           रानी
             ती

     सरली पानगळ
    सुकला पाचोळा
       बोडके थळ
         तापतो हा
          खट्याळ
             वारा
              ही

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार


कविता -अवकाळी

अवकाळी

माझ्या आयुष्यात तुझे असे
अवकाळी येणे
उध्वस्त करून गेले
माझे सारे जीणे
तुझ्या येण्यापूर्वी दरवळणारा
मन धुंद करणारा तो सुगंध
वा-याची मंद मंद झुळूक
यावेळी नव्हतचं काही
तुझ्या माझ्यात
तू यावा ही अंतरीक ओढ
कुठ कुठच दिसली नाही
तुझ्या प्रतिक्षेत
वाटेकडे लागणारे डोळे
तू येणार आहेस असे सुचक
चिन्ह दिसताच
तो मनाला होणारा हर्ष
नव्हत्या रे या वेळी
या भावना ही
उगाचच असते बघ तुझी घाई
अरे,तिला थोड तरी तरसू दे
मगच तुझ्या सरी तू तिच्यावर
बरसू दे
मग बघ ती कशी धुंद होते
तुझ्या प्रेमात चिंब होते

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Sunday 15 September 2019

कविता-कोप घडला


कोप घडला
तुझ्या मुखावर हास्य पाहण्या
आतुरले होते मेघ सारे
पण आले कसे अचानक
दहशतीचे थेंब टपोरे
कोमल तिच्या देहावर
केला तांडव त्याने
झाली छिन्नविछिन्न काया
किती हे केविलवाणे
होऊन स्वार केली
दैना ही लेकरांची
घास तोंडचा पळविला
वाट दाविली यमसदनाची
केवढा हा कोप घडला
अपराध काय नडला
झाली रिती ओंजळ
घातला प्रचंड घाला
होते तुझ्या जीवावर
केले बेघर तयांना
प्रत्येक जीव रडला
सोडून पाखरांना
होते नव्हते सारे गेले
दूर दूर ते घरकुल नेले
आक्रोशाने आसमंत चिरले
प्रेम कसे हे ओस पडले
पटले का तुझ्या मनाला
वागणे तुझे रे विघ्नकारी
कसे जगावे सांग ना
घेवून श्वासाची उधारी
गुदमरला जीव तिचा
तरी सोडली ना आस
घडले दर्शन माणुसकीचे
ना घडला कुणा उपवास

सौ.जया नेरे
9423918363

कविता-पावसा





पावसा
आलास पावसा !
ये तुझ्या स्वागतासाठीच
उभी आहे ही धरा
अगदी वेळेत आलास
नाहीतर तुझ्या अवेळी येण्याची
सुरू असते बघ चर्चा
कधी कवितेतून,कधी गझलेतून तर कधी शाळकरी मुलांच्या
ये रे ! ये रे ! पावसा !
या गाण्यातून...
तुझ्या विरहात ती ही किती
तापते
स्वतःच्या देहावर ती
उष्ण झळा सोसते
सोसत सोसत स्वतःलाच
मात्र ती कोसते...
तिच्या तप्त देहावर
होरपळतात सारे
आणि रूसतात तुझ्यावर
ते शितल वारे
पण पावसा तू आलास आणि
हसले बघ वृक्ष वेली पशू पक्षी
आणि डोंगरातील झरे...
पावसा... येतांना तू एवढा
आदळआपट करत येतोस
कधी झाडांवर,कधी घरांवर
किती नुकसान होते बघ
तेव्हा तर पावसा खूप भिती
वाटते रे तुझी
तुझ्या येण्याची
कधी कोणावर आपटशील
सांगता येत का काही....
जरा दमानं घेत जा
सावकाश
कुणी दुखावणार नाही
असा येत जा....
आता आलायेस तर थांब जरा
वाहू दे नवचैतन्याचा झरा
तप्त तिच्या देहावर
सतत बरसू दे थेंबांची सर
पांघरव तिला तुझ्या
प्रेमाची चादर
तुझ्या सहवासाने खुलेल
तिचा चेहरा
शहारेल अंगअंग सारे
तृप्त होईल तिचा कणन् कण सारा
दरवळेल चोहीकडे सुगंध वारा
तुझ्या एका थेंबाने पसरेल मृदूगंध
होतील मग अत्तराचे दुकानं बंद
तिच्या सुवासाने धुंद होईल ही सृष्टी
हटणार नाही तिच्या वरून
कुणाची दृष्टी
जेव्हा तिच्या शृंगारासाठी
फुलतील फुलं
तेव्हा आनंदीत होतील सारी मुलं
उत्साहाने वाहतील नदी नाले
जेव्हा सर्वांगाने होतील ओले
आनंदाश्रूंनी भरतील झरे
डोंगर दरीतून पळतील सारे
पावसा तुझ्या येण्याची सुचना
देतो वाहणारा वारा
आनंदतो मग प्रत्येक
कणकण सारा...
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

कविता-शिक्षक



शिक्षक

कुठे ठाऊक होती त्याला
होळी आणि दिवाळी
नवनवीन आव्हानांची
झेलत होता गोळी
सर्व करत करत
होत होती दमछाक
गुणवत्ता आणि कागदपत्र
याने पाठीवर आले बाक
विद्यार्थी समोर येताच
विसरायचा सारे भान
त्यांच्या कडूनच मिळायचा
त्याला पूरेपुर मान
चिमण्या पाखरांचा
त्याला लागला होता लळा
म्हणूनच डोळ्यासमोर दिसायचा
विद्यार्थी आणि फळा
कोवळ्या जिवांची कुणी
बनवलीय प्रयोगशाळा
फुलू द्या ना आनंदाचा
फक्त येथे मळा
ताणतणावाखाली राहून
आरोग्य गुरूजींचे बिघडले
त्यात आता शिक्षणातही
राजकारण घडू लागले
योग्य तिथे योग्य त्याला
न्याय कुठे मिळतोय
स्वतःच्या नावासाठी
कित्तेकांच्या पाय पडतोय
बिघडलेली घडी आता
होईल कधी नीट
मिळेल का कुठे अशी
लावायला याला तीट
आर्त हाक शिक्षकाची
ऐकेल ना प्रशासन
की फक्त त्याच्यासाठी
असेल फक्त शासन....
आणि फक्त शासन....
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Saturday 14 September 2019

बालगीत-फुलपाखरांची शाळा





बालगीत
फुलपाखरांची शाळा         
बागेमध्ये सुरू जाहली
फुलपाखरांची शाळा
निळे,जांभळे,काळे,पिवळे
झालीत सारी गोळा
रंगीबेरंगी फुलांवरती
तुटून पडले सगळे
फुलांमधील मधुरसाचे
भोजन केले आगळे
गुं गुं करत म्हटली गाणी
ताल धरला सगळ्यांनी
पंखांचा तो ढोल वाजता
नृत्य केले बेधुंद होऊनी
स्पर्धा लागली पळण्याची
फुलाफुलांवर उडण्याची
रंगारंगांना जोडण्याची
चढाओढ जिंकण्याची
चिमुकल्या त्या पंखांवरती
नक्षी सुंदर कोण काढती
फुलांसारखेच रंग तयांचे
सा-यांना कसे वेड लावती
पहा मुलांनो करा मजा
आनंदाने जीवन जगा
आम्हास मात्र नको सजा
बांधू नका पायास धागा
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

माझी कविता-
फुलपाखरांची शाळा-
आज दि-18/09/2019 च्या "दै.दिव्य मराठी" या वृत्तपत्रातील
"किड्स कॉर्नर" या सदरात प्रकाशित...
संपादकसो यांचे मनस्वी आभार...

आदरणिय श्री.दासू भगत सर यांचे मनस्वी आभार... 





सहसंपादित दिवाळी अंक- व सहभाग
















माझे संपादन व सहसंपादन केलेले साहित्य

माझे संपादन व सहसंपादन केलेले साहित्य



माझे प्रकाशित साहित्य

माझे प्रकाशित साहित्य



कविता-सांग ना पावसा


सांग ना पावसा

सांग सांग ना पावसा
असा किती रे येशील
कुजतील सारी पिके
घास मुखीचा नेशील

होऊ नको बघ क्रुर
आता निरोप तू घे ना
पसरेल रोगराई
राग मनाचा सोड ना

बहरली पिके सारी
छान कणिस फुटले
शाळू जोंधळा मोत्यांनी
रान किती रे नटले

डोळे उघड बघ रे
आहे तुझेच हे दान
पान फुलांचे घातले
तिने दागिने हे छान

पुन्हा घेवून येशील
छान सुखाच्या या सरी
वाट पाहिन तुझी रे
येसी धावून सत्वरी

सौ.जया नेरे
नवापूर
9423918363

कविता-आमच्या गावाकडे




आमच्या गावाकडे

आमच्या गावाकडे
आताशा कुठे हिरवी हिरवी
कुरणे बघायला मिळतात?
तिथे ही बरसत नाही
अलिकडे पाऊस
आणि नाही कुणाला शेतीची हौस
ओसाड भकास माळरान सारे
धावताय पोटापाण्यासाठी
शहराकडे
आमच्या गावाकडे
खळखळ वाहणारे नदीनाले
राहिलेत कुठे
आटलीत सारी राहिलेत कुठे
पाणवठे
दिसत नाही कोणी नदीत
पोहतांना
नदीकिनारी मुलं दिसतात कुठे
खेळतांना
नसते तिकडे बायकांची लगबग
घराच्या ओढीने चालण्यात येणारा
वेग
देवळात हल्ली शुकशुकाट असतोय
आरतीच्या वेळी सारा गलका
टिव्ही समोर दिसतोय
निसर्गाप्रमाणे माणसांची
मनेही सुकलीत
भविष्याच्या चिंतेने ती आता
सारीच वाकलीत
निसर्गाचा कोप माणसाला
गिळू पहातोय
गावच्या गाव ओस पाडतोय
म्हातारे कोतारे फक्त ओसरीवर
दिसतात
शेवटचे आपले क्षण बोटावर
मोजतात
थकलेत ते ही सुरुकुतल्या शरिराचे
ओझे झेलतांना
गावाकडची सारी जबाबदारी नेटाने
पेलतांना
आमच्या गावाकडे....
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

कविता-सांग ना बाप्पा



सांग ना बाप्पा
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?
होऊन पावसाच्या सरी
हवे तिथे हवे तसे तरी
पडशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

कुठे अति बरसतोय
कुठे मात्र पाठ फिरवतोय
या ना त्या कारणाने
दुष्काळाचे सावट पसरवतोय
बाल बच्च्यांच्या मुखात
चटणी भाकरीचा घास तरी
देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढं तरी करशील का?

या ना त्या कारणाने
जातोय प्रत्येकाचा जीव
कुठे अपघात तर
कुठे आत्महत्त्येचे प्रमाण वाढलयं
हे सारे तू विविध रूपाने येवून
आटोक्यात आणशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

बाप्पा खालावत चालली
मुल्य जीवनातील
जो तो करतोय अरे रावी
ना वयाचे जाण ना
स्त्रियांचा मान
प्रत्येकाचे मन संस्काराने
भरशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

प्रदुषणांनी गजबजलेय
गाव शहर वस्ती सारे
वाहत नाही कुठेच
मोकळे शुद्ध वारे
यासाठी वृक्षलागवडीचे
भान सा-यांना देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

नोकरी अभावी नवयुवकांची
गळचेपी होतेय
शिक्षण घेऊन बेकारीचे
जीवन जगतोय
नैराश्येने हतबल होऊन
शरीर गमावून बसतोय
सुदृढ सकस शरीरयष्टीचा
ध्यास पुन्हा देशील का?
सांग ना बाप्पा जाताजाता
एवढे तरी करशील का?

सौ.जया नेरे
नवापूर

माझा साहित्य परिचय


*सौ.जया निंबाजी नेरे.*
प्राथमिक शिक्षिका
जि.नंदुरबार
*जन्मतारीख*-२३/०५/१९६९
*निवास*-नवापुर ता.नवापुर जि.नंदुरबार

*शिक्षण*-डी.एड./बी.एड./एम.ए.(मराठी)एम.एड.

*छंद/आवड-*
कविता लेखन-गायन-वाचन

*प्रेरणा*-
काव्यप्रेमी शिक्षकमंच

*पद-*
१)काव्यप्रेमी शिक्षकमंच- राज्यसमिती कार्यकारणी सदस्य
२)विश्वशांती सेवाभावी संस्था-पुणे-जिल्हाध्यक्ष
३)अंकुर साहित्य संघ- जिल्हा कार्यकारणी सदस्य
४)अ.भा.शि.साहित्य कला व क्रिडा मंच,मार्फत नंदुरबार जिल्ह्यात काम करण्याची संधी
*काव्यमहोत्सव व प्रकाशन सोहळा-प्रमुख पाहुणे पद-
१)साई प्रतिष्ठान सेवाभावी संस्था -वडगावशेरी,पुणे येथे काव्य महोत्सव व प्रकाशन सोहळा-२०१७
२)साई प्रतिष्ठान व विश्वशांती सेवाभावी संस्था -पुणे येथे काव्य महोत्सव व प्रकाशन सोहळा-२०१८
३)श्री गाडगेमहाराज विचार मंच,ओतूर-२ रे राज्यस्तरीय काव्यसंमेलनात -ज्ञानज्योती कविसंमेलन सत्राचे अध्यक्ष स्थान

*पुरस्कार-*
१)महाराष्ट्र अॕडमिन पॕनल-उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार-२०१७
२)न्यायिक लढा व पत्रकार संघ-चाकण-पुणे- यांचे मार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार -२०१७
३)जिल्हा परिषद ,नंदुरबार तर्फे उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार-८मार्च २०१८
४)हिरकणी काव्यमंच-जालना- हिरकणी पुरस्कार-२०१८
५)पंकज शैक्षणिक व सामाजिक संस्था ,चोपडा मार्फत-साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल सन्मान व सत्कार
६)श्री साई प्रतिष्ठान व विश्वशांती सेवाभावी बहुउद्देशिय संस्था-पुणे मार्फत "विश्वशांती काव्य गौरव" पुरस्काराने सन्मानित
*७)"विचार विद्यार्थ्यांचे"* या राज्यस्तरीय वृत्तपत्र संपादक यांचे मार्फत परंडा(उस्मानाबाद) येथे *काव्यसावित्री* पूरस्काराने सन्मानित
८)श्री.गाडगेमहाराज विचारमंच,ओतूर तर्फे "क्रांतीज्योती सावित्रीबाईफुले काव्यगौरव" पुरस्काराने सन्मानित

*संपादित साहित्य* -
१)काव्यप्रेमी शिक्षक मंचचे "कविता स्वातंत्र्याच्या" प्रातिनिधिक काव्यसंग्रह-२०१७
२)दिवाळी अंक-संपादक प्रतिनिधी- मैफल प्रकाशनचे-प्रकाशक/संपादक-श्री.काशिनाथ भारंबे यांच्या  "मैफल...सर्वांची...सर्वांसाठी"-दिवाळी अंक-२०१८
३)काव्यप्रेमी शिक्षकमंचचे "खान्देशनी राणी अहिराणी" हा अहिराणी बोलीभाषेतील प्रातिनिधिक काव्यसंग्रह

*प्रातिनिधिक काव्यसंग्रह सहभाग*-
काव्यप्रेमी शिक्षकमंच मार्फत प्रकाशित काव्यसंग्रह-
*क्षितिज काव्यप्रेमींचे*- झाडे लाव
*गुरु*- शिक्षक
*शिवकाव्य* राजे पुन्हा जन्माला या
*होली के रंग सबके संग- हिंदी प्रातिनिधिक संग्रह* जश्न होली का...
*कविता स्वातंत्र्याच्या* गान स्वातंत्र्याचे स्मरू
*आसमंत काव्यप्रेमींचे*ठेव सुखी बळीराजा
*अष्टाक्षरी*- होता मिलन दोघांचे
*शंख,शिंपले आणि.......*या काशिनाथ भारंबे(निर्मोही),भुसावळ,संपादित -प्रातिनिधिक काव्यसंग्रहात १० कवितांचे प्रकाशन-
*श्री.साई प्रतिष्ठान सेवाभावी संस्था -पुणे यांचे संजयभाऊ चौधरी संपादित प्रातिनिधीक काव्यसंग्रहात एक एक कविता प्रकाशित
*शब्द सरिता* - साईबाबा
*स्री शक्तीचा जागर*-तूच जननी
*श्री.साई प्रतिष्ठान सेवाभावी संस्थेच्या एकूण ९ प्रातिनिधीक  काव्यसंग्रहात एक-एक विषयानुरूप कविता प्रकाशित
*गोवा सौंदर्य -या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात-"माझ्या मनातील गोवा"ही कविता प्रकाशित
*काव्यांगणातील चिवचिवाट*या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात *चिऊताई*ही कविता प्रकाशित...
संपादक -प्रिती माडेकर-काव्यांगण प्रतिष्ठान-यवतमाळ
*खान्देशनी वानगी* या त्रैमासिकात अहिराणी बोलीभाषेतील कविता- १)चाकरगडी
२)भाकर
३)मन म्हनं बी जानी ल्याना
४)गोधडीनी सर

*प्रस्तावना लेखन-*
१)*ध्यास व्यसन मुक्तीचा*-संपादक-श्री.संजय भाऊ चौधरी यांचे प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रस्तावना लेखन
२)संपादक-सौ.सरला साळूंखे यांचे *लेखनी सरलाची* या काव्यसंग्रहाचे प्रस्तावना लेखन

*शुभेच्छा लेखन-
*चारोळी संग्रह *"तूच....तू..."* या कवी प्रविण पानपाटील,साक्री जि.धुळे यांच्या
संग्रहास शुभेच्छा लेखन
*प्रा.शि.कवी हंसराज देसाई-मालेगाव यांच्या *चांदण्यांचे गाव* या बालगीत संग्रहाचे मलपृष्ठासाठी संग्रहाचे परिचय लेखन

*वृत्तपत्रातील काव्य प्रकाशन*-
*संचार वृत्तपत्र-सोलापूर* प्रकाशित साहित्य -
१) *महाराष्ट्र माझा* या कवितेचे आशाताई पाटील,सोलापूर यांनी केलेले रसग्रहण
२) देशभक्तीपर बालकाव्य-
*गान स्वातंत्र्याचे*
३) बैल पोळ्या निमित्त -*सण पोळ्याचा* व -*सण* ही कविता
४) आषाढी एकादशी निमित्त -अभंग रचना
*पुण्यनगरी-सोलापूर* वृत्तपत्र-यात देशभक्तीपर कविता- *ध्वज तिरंगा*
*सोलापूर येथील माणदेश नगरी* या वृत्तपत्रात प्रकाशित *पोळा* ही कविता

*आपला महाराष्ट्र* -वृत्तपत्रात प्रकाशित साहित्य---
*दसरा* ही रचना दसरा सणानिमित्त
*दै.आपला महाराष्ट्र* या वृत्तपत्रात साप्ताहिक "बहर" या सदरात प्रकाशित लेख-
१)रक्षाबंधन या सणा निमित्त -नाते कच्च्या धाग्याचे -लेख
*कथा-*
१)दिवाळी सणानिमित्त-
मामाचं गाव कुठ हरवलं
*प्रकाशित काव्य रचना-*
पावसा बरस रे
सावळ्या हरी
सण पोळ्याचा
रडत आहे भारतमाता
विश्वशांती
कृष्णमुरारी
तिरंगा (देशभक्तीपर रचना)
कसे जगावे तिने
*महाराष्ट्राचं गाणं
*मुंबईचे दै.डहाणू मित्र-वृत्तपत्रातील प्रकाशित काव्यरचना*
नमन करितो-प्रार्थना
विठ्ठल-अभंग
मी तिरंगा बोलतोय
आम्ही शिक्षक
सण पोळ्याचा
आदिशक्ती
काळीआई
सण हा पोळ्याचा
तिरंगा - देशभक्तीपर हिंदी रचना
पाऊस कोपला

*दै.लोकमंथन वृत्तपत्र-नगर- यात अभंग रचना- *प्रभूच्या चरणी*

*लोकसंकेत वृत्तपत्रात-श्रावण महिन्या निमित्त "श्रावण" ही कविता

*दै.महासत्ता-इचलकरंजी यांच्या *तुषार* पुरवणीत प्रसिद्ध कविता
१)खिडकी आडून
२)कधी मोकळे
३)अवकाळी

*दिवाळी अंकातील प्रकाशित साहित्य-*
१)*संचार'दिवाळी अंक-२०१७*
यात 'आली दिवाळी' ही अभंग रचना प्रकाशित...
२)*रंगतदार दिवाळी अंक-२०१७*यात  प्रकाशित साहित्य ...
*समीक्षण--"अक्षरांगण"- संकल्पना-संपादन श्री.आनंद घोडके व सहसंकल्पना राजदत्त रासगोलीकर यांची असलेले शालेय बाल कवींनी लिहिलेल्या काव्यसंग्रहाचे समीक्षण
*आपला महाराष्ट्र*-रसग्रहणासह
*सण हा पोळ्याचा*
*रूप धरेचे*
३)*रंगतदार*२०१८- बालसाहित्य असलेला दिवाळी अंक- यात
*बालकथा - दिपक ज्योती*
४)*भुमिका* दिवाळी अंक-२०१८-
*लेक* ही कविता
५)मैफल ...सर्वांची...सर्वांसाठी-दिवाळी अंक-२०१८ यात
*खेळ भातुकलीचा*
*अंभग-विठ्ठल*
६)काव्यप्रेमी दिवाळी अंक-२०१८
*कथा*- पणती जपून ठेवा
७)*विद्यार्थी विचारांचे* दिवाळी अंक-२०१८ यात
१)अभंग रचना- *प्रभूच्या चरणी*
२)बाळ
८)*दर्पण*-दिवाळी अंक-२०१८-
*कथा-* मामाचे गाव कुठे हरवले
९)*संचार-* दिवाळी अंक-२०१८- यात
*अशी ही दिवाळी* काव्य रचना

*मासिक*-
१)गुन्हे सर्च मासिक-
कविता-होता मिलन दोघांचे

*काव्यवाचन स्पर्धेतील सहभाग*-
१)कुसुमाग्रज प्रबोधिनी साहित्य संघ-नाशिक येथे काव्य वाचन स्पर्धेत सहभाग-प्रमाणपत्र देवून सन्मानित
२)शारदा बहुउदेदेशिय संस्था-नाशिक यांच्या मार्फत झालेल्या काव्य स्पर्धेत -द्वितीय क्रमांक-प्रमाणपत्र व रोख बक्षिस रूपाने सन्मानित

*विविध काव्यलेखन स्पर्धेत सहभाग- उत्कृष्ट ते उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त
*काव्य लेखन,चारोळी लेखन व लेख लेखन विविध स्पर्धेत परिक्षक म्हणून काम पाहिले.
*राज्यभरात काव्यसंमेलन,महोत्सवात सहभाग प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले.

*९१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन-बडोदा येथे  काव्यवाचनासाठी काव्याची निवड व काव्यवाचनाची संधी व सहभाग...

*८वे मराठी साहित्य संमेलन -जिल्हा-नंदुरबार मार्फत तळोदा येथे काव्यवाचनाची संधी व सहभाग...

*काव्यप्रेमी शिक्षकमंच-विविध जिल्ह्यातील काव्यमहोत्सवात-अक्कलकोट,सिन्नर,लातुर,घाटंजी(यवतमाळ)

*श्री.साई प्रतिष्ठान सेवाभावी संस्था-काव्यसंमेलन -पुणे
*विश्वशांती सेवाभावी संस्था-काव्यसंमेलन-पुणे
*मैफल प्रकाशन-काव्यसंमेलन-भुसावळ
*काव्यांगण प्रतिष्ठान-यवतमाळ
*कुसुमाग्रज प्रबोधीनी साहित्य संघ-नाशिक
*शारदा बहुउद्देशिय संस्था-नाशिक
*अहिराणी साहित्य संमेलन-नाशिक,दोंडाईचा
*नक्षत्रांचे देणं संमेलन-पाचोरा
*कामगार संघ संमेलन-धुळे
*कालीदास कवी कट्टा-धुळे
*अंकुर साहित्य संमेलन-नंदुरबार
*मराठी साहित्य परिषद व जीवनगौरव कवीसंमेलन-निगडी-पुणे
*स्थानिक पातळीवर प्रासंगिक काव्यसंमेलनात सहभाग
*परिमल साहित्य मंच,कवीसंमेलन-चाळीसगाव,पाचोरा इ.ठिकाणी
*श्री.गाडगेबाबा विचार मंच,राज्यस्तरीय काव्यसंमेलन
*काव्यप्रेमी शिक्षकमंच* चे नवापूर जि.नंदुरबार येथे,
जिल्हा स्तरीय,
तालुकास्तरीय,
राज्यस्तरीय काव्यमहोत्सवाचे मुख्य संयोजक
*काव्यसंमेलनांची विविध वृत्तपत्रांनी घेतली दखल.
*रजिस्टर्ड काव्यप्रेमी शिक्षकमंचचे नंदुरबार व धुळे जिल्ह्याचे पालकत्व
*विशेष कवीसंमेलन-स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वरील काव्यस्पर्धा व नंदुरबार जिल्हास्तरीय काव्यसंमेलन आयोजनाची जबाबदारी-स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक,मुंबई यांनी दिलेल्या नियोजनानुसार
*विविध वृत्तपत्रांनी घेतली दखल
*प्रकाशन साहित्य-*
१)पणती जपून ठेवा-काव्यसंग्रह
२)एक काव्य तुला समर्पित- काव्य संग्रह
३)आनंद झुला- बालगीत संग्रह
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363