Wednesday 10 June 2020

बालकविता- फुलराणी

फुलराणी

बागेमध्ये होणार आज
नाच आणि गाणी
फुलांना भेटावयास
येणार आहे फुलराणी

लाल पिवळ्या गुलाबाला
उठवले सर्वांनी
सांगायची होती त्यांना
फुलराजाची कहाणी

ऐटीत येत जास्वंदाने
केले नृत्य छान
नाचता नाचता मधेच तो
हलवत होता मान

मोगरा जाई जुईचा मात्र
थाट होता मोठा
त्यांच्याकडे होता खूप
अत्तराचा साठा

चाफा मात्र नेहमीप्रमाणे
बसला होता गुपचूप
त्यामुळे सारेच त्याला
चिडवत होते खूप

पाहून सा-यांना खूश
सुखावली फुलराणी
डबडबले डोळे तिचे
थरथरली वाणी

गुण्या गोविंदाने रहावे
स्वप्न होते तिचे
दुःख विसरून सारेच
हसू चेहऱ्यावर दाखवायचे


सौ.जया नेरे





Thursday 4 June 2020

बालकविता- ढग पावसाळी

ढग पावसाळी

आले आले बघा
ढग पावसाळी
पाण्याने भरण्या
नदी,नाले,तळी

काळ्याभोर रंगाचा
घालून सदरा
धावतो पळतो
येतो जेव्हा धरा

जेव्हा जेव्हा त्याचा
डाव सुरू होतो
क्षणात सूर्याचे
डोळे तो झाकतो

जमलीत सारी
कराया विचार
कुठे जायचे कसे
सांगा सांगा लवकर

पाण्याच्या घागरी
निघाले घेऊन
एकेका घागरीने
केले अंगणी शिंपण

रिमझिम सरींनी
झाले अंगण ओले
ये रे ये रे पावसा हे
गाणे सुरू झाले

सौ.जया नेरे