Thursday 30 April 2020

बालगीत- देवबाप्पा

देवबाप्पा

देवबाप्पा का रे
एवढा नाराज?
खेळायला कसा
येत नाही आज?

नको नको बाबा
घरातच राहू
कोरोनाशी लढा
आपणही देवू

शाळेलाही सुट्टी
नाही अभ्यासाला
घरीच बसून
शिकू दोघ चला

सारे सांगतायं
हात स्वच्छ धुवा
बाहेर जातांना
तुम्ही मास्क लावा

देवबाप्पा दे तू
कोरोनाशी लढा
असेल का रे तो
तुझ्याहून चढा?

कोरोना संपव
घरी जाता जाता
लॉकडाऊनने
कंटाळलो आता

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार






Friday 24 April 2020

बालकविता- झोका


झोका
झोका जाई वरवर
वारा येई भरभर
चल ताई आपण
झोका झोका खेळू
छान छान गाणे
वा-यासंगे बोलू
आळीपाळी दोघं
झोक्यावर बसू
वर जाता झोका
येते मला हसू
गूं गूं होते कसे
पोटामध्ये माझ्या
गुदगुल्या होताच
येई मला मजा
आंब्याच्या वाडीत
बांधलाय झोका
झाडावरील पक्षी
मारतोय हाका
काऊ आणि चिऊ
सारे तेथे जमले
त्यांच्या सोबत कसे
खेळण्यात रमले
सौ.जया नेरे

Thursday 23 April 2020

कविता- वाचवू वसुंधरेला

२२ एप्रिल - जागतिक वसुंधरादिना निमित्त-
वाचवू वसुंधरेला

सौंदर्य वसुंधरेचे खुलविण्या
वृक्ष,वेली यांचे करू रक्षण
वाताहात होईल स्वतःची
जर होईल झाडांचेच भक्षण

स्वच्छ,निर्मळ,शुद्ध हवा
गरज आहे तिची प्रत्येक देहा
प्रदुषणाचा होतोय भडिमार
कृत्रिमतेचा सहारा घेतोय पहा

नसेल वृक्ष प्रत्येक घरीदारी
तर घ्यावी लागेल श्वासाची उधारी
सिमेंटचे  हे जंगल वाढवून
मानवा स्वतःचा आहे तूच शिकारी

वसुंधरे दिनी करू संकल्प सारे
एक झाड लावू जगवू त्याला
वसुंधरेला वाचवण्याचा हा
समजेल मुलमंत्र ज्याला


सौ.जया नेरे

बालकविता- वेडा आंबा

वेडा आंबा
आंब्याच्या झाडावर
होते आंबे सात
त्यातील एकाशी कुणी
करत नव्हते बात

एकटाच बसायचा
एकटाच खेळायचा
इकडे नि तिकडे
एकटाच पळायचा

स्वभावाने वेंधळा
होता जरा बावळा
सर्वांमध्ये होता तो
थोडाफार वेगळा

रंग नाही रूप नाही
होता वेडा वाकडा
डोळे होते तिरळे
होता जरा जाडा

एकदा झाडावरच
लागला तो रडायला
कुणीतरी दगडाने
लागले पाडायला

राजू म्हणत होता
आईबाबा जरा थांबा
आवडला होता त्याला
वेडा तोच आंबा

वेडा आंबा आज होता
खूपच खुशीत
कारण जावून बसला तो
राजूच्या कुशीत

सौ.जया नेरे

कविता- आयुष्याचे पुस्तक

जागतिक पुस्तकदिना निमित्त -
आयुष्याचे पुस्तक

आयुष्याचे पुस्तक
वाटले मज कठीण
अक्षरांच्या गुंतेची
जर घट्ट होती वीण

एक एक पानांचा
सरकत होता दिन
वर्ष वर्ष संपे तरी
संपत नव्हता शीण

दुःखाची आकडेवारी
दिवसेंदिवस वाढली
गोळाबेरीज करतांना
सारी बाकीच काढली

अधिक उणे करण्यात
बसत नव्हता ताळा
महागाईमुळे खर्चावर
कसा बसेल आळा?

आयुष्याच्या पुस्तकाची
संपत आली पाने
संपले नाहीत अजुनही
सुखदुःखाचे गाणे

सौ.जया नेरे












Thursday 16 April 2020

कविता- तुझे बोट धरून

तुझे बोट धरून

तुझे बोट धरून
पहिले पाऊल टाकले
बाबा तुझ्या कडून मी
मधाचे बोट चाखले

तुझ्या डोळ्यानीच मी
जग सारे पाहिले
माझ्या सुखासाठी बाबा
जीवन स्वतःचे वाहिले

उपडा होऊन माझ्या साठी
व्हायचासं तू घोडा
कधी पडायचासं तर
कधी रडायचास थोडा

चोकोबार,आईस्क्रीम,
आणायचास घरी
फिरायला न्यायचासं
थकत असला तरी

सांग ना बाबा मी पण
कधी होईन बाबा
तेव्हा मी ही आणीन
तुला खाऊचा डबा

तुझी आणि माझी
अशीच राहिल ना दोस्ती
शेवट पर्यंत आपण दोघं
करू या खूप मस्ती

सौ.जया नेरे

Tuesday 7 April 2020

बालकविता-आला उन्हाळा

आला उन्हाळा

आला आला उन्हाळा,
तब्बेतीला सांभाळा,
पाणी प्या भरपूर,
उन्हात जाणे टाळा....

लिंबू,चिंच,कोकम शरबत,
अन् पन्हं प्या कैरीचे,
झळ लागेल तुम्हा,
चटके झेलू नका ऊन्हाचे,..

करा डोळ्यांचे रक्षण,
रुमालाचा करा वापर,
घर ठेवा थंड तुम्ही ,
वाळ्याचा करा वापर...

रसदार फळांचे सेवन,
हलके फुलके करा जेवण,
शिळे अन्न खाऊ नका,
आरोग्याचे करा जतन...

उष्माघात होईल जेव्हा,
भिती असेल कोमाची,
आपल्या प्रमाणेच घ्यावी,
काळजी जनावरांची,

रक्तातील पाणी घटू नये,
पाणी प्यावे भरपुर,
काळजी घ्यावी सर्वांनी,
संपेल जीवन नाहीतर....

सौ.जया नेरे..
नवापुर जि.नंदुरबार
(आनंद झुला या माझ्या बालकाव्यसंग्रहातून)

कविता- कोराना

कोरोना

सांग देवराया आता
कधी मिटेल कोरोना
सुट्टी नको शाळा हवी
नको मुलांची वल्गना

घरी बसून बसून
झाले सारे रे बेजार
काम नाही धंदा नाही
दिला पोटावर मार

बोल नाही चाल नाही
सारे झाले गप गार
जणू सृष्टीला लागला
असा कसा हा आजार

हात धुवा,मास्क बांधा
योग्य ठेवा हो अंतर
संसर्गाने झाला तर
कसे जगावे नंतर

दर वर्षाला भोवतो
निसर्गाचा कसा कोप
अरे आतातर आहे
विदेशींचा हा प्रताप

त्रास नको कष्ट नको
नको कोणते संकट
नको विपत्ती कोणती
नको मानवाचा कट

सेवा डॉक्टरांची मिळे
मिळे पोलीस रक्षण
जीव ठेवून गहाण
जपे आम्हा रात्रंदिन

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार