Thursday 28 May 2020

मोकळा श्वास- लघुकथा


सौ.जया नेरे
                          नवापूर जि.नंदुरबार
                            9423918363

           मोकळा श्वास

एक-दोन दिवसांपासून संजीवनीला असं जाणवत होत की मिनू खूप उदास उदास राहतेय. नीट जेवत नाही की अभ्यासाला ही तिचे लक्ष लागत नाही.आपल्या रूममध्ये लोळत पडलेली असते.संजीवनीला वाटायचं की होईल व्यवस्थित दोन दिवसात.परंतु तिच्या वागण्यात अजिबात बदल होत नव्हता.तिला आपल्या मुलीची चिंता वाटू लागली.का असं वागतेय मिनू.काय होत असेल हिला.संजीवनीने तिला जवळ बोलवले.तिच्या डोक्यावरुन हात फिरवला.मांडीवर बसविले व हळूवार तिला विचारले ,अग मिनू,तुला काय होतयं बाळा,का एवढी उदास असतेस,नीट जेवत ही नाही की अलिकडे तू पुस्तक ही उघडले नाही.सांगशील का बच्चू आपल्या आईला.मिनूने आईचे शब्द ऐकले आणि तिला रडूच कोसळले.साठवलेले अश्रू घळघळ वाहू लागले. आईच्या कुशीत मनसोक्त रडून झाल्यावर मिनू हळूहळू आईला सांगू लागली.सांगतांना कसे सांगावे या संभ्रमात ती होती.
मिनू म्हणाली,आई ऐक ना ,मला का असं होतयं,काय झाल असेल गं मला,मी जिवंत राहिल ना गं. मिनूचे बोलणे ऐकून संजीवनी जास्तच घाबरली.काय झालं असेल माझ्या मिनूला.
संजीवनीने मिनूला छातीशी घट्ट धरले व तिच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले. वाहणारचं ना आईला मुलांच्या डोळ्यातील अश्रू जास्त कमजोर करतात.
अगं मिनू सांग तरी तुला काय होतयं.
आई ,मला ना लघवीच्या जागेतून रक्त येतयं,मी आता मरणारचं आहे बघ.माझं पोट ही खूप दुखतयं ग आई,कंबर तर तुटेलच असं वाटतयं. खरचं मी मरणार आहे ना आई,सांग ना गं !
संजीवनीला आता हायसं वाटलं की मिनूला काही सिरियस झाले नाही.
संजीवनीने मिनूला सांगितले अग मिनू एकदा हस बरं.अग वेडी तुला काही झालं नाहीये.अगं असं प्रत्येक मुलीला वयात आल्यानंतर होत असतं.
मिनूने लगेच विचारले,'अगं आई,मुलगी वयात येणं म्हणजे काय असतं गं,सांग ना.
संजीवनीने तिला समजेल अशा भाषेत सांगितले की मुलगी १२-१३ वर्षाची झाली की तिला असा त्रास होतो तेव्हा मुलीचे वयात येणे म्हणतात.म्हणजे स्री मध्ये जी मुख्य लक्षणं हवीत ते म्हणजे मासिक पाळी सुरू होणे,तुला जो त्रास आता होतोय ना त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात.
बघ मिनू तुला आठवतं का आजी तुम्हाला म्हणायची आई जवळ जावू नका तिला कावळा शिवलायं. अगं मिनू,ते कावळा शिवणे होते ना,तेव्हा मला ही असाच त्रास होत होता. त्या काळी मुलांशी वा इतरांशी या बाबत मोकळेपणे बोलले जात नव्हते.आणि या काळात स्रिला कशाला ही शिवू देत नव्हते.पण बाळा आता हे सगळं बदललयं, तशी परिस्थिती आता राहिली नाही.
आणि हो गं माझचं चुकलं ,कामाच्या धावपळीत तुला याबाबत सांगायचे राहुन गेले,नाही तर तू घाबरले नसते.संजीवनीला तिची ही चुक चटकन लक्षात आली की आपण जर आधीच मिनूला सर्व माहिती सांगितली असती तर मिनूला असा शॉक बसला नसता.
संजीवनीने ठरवलं की मिनूला याबाबतीत सर्व माहिती द्यायची.
एके दिवशी दोघं मायलेकी फिरायला निघाल्या व रस्त्यात संजीवनीने मिनूला मासिक पाळी चक्र कसे सुरू असते या विषयी माहिती सांगितली. आणि अशा वेळी कशी काळजी घ्यायची,आहार काय घ्यायचा,आपल्या शरीराची काळजी कशी घ्यायची,यातून धोके काय आहेत.तसेच पॕडचा वापर कसा करायचा व स्वच्छता कशी ठेवायची या बाबतीत सखोल माहिती दिली.
हे सर्व ऐकून मिनूच्या मनावर जे ओझे होते ते कमी झाले.ती मोकळेपणाने राहू लागली.प्रत्येक गोष्ट ती आपल्या आईशी शेअर करू लागली.त्या दोघींच्या हे लक्षात आले नाही की कधी त्या जिवलग मैत्रीणी झाल्या. मिनू या सर्व गोष्टी आपल्या मैत्रिणींशी शेअर करू लागली.
एक दिवशी संजीवनी मिनूच्या शाळेत गेली,तेथील शिक्षिकांशी संजीवनी या बाबत सविस्तर बोलली.शिक्षिकांच्या ही बाब गंभीर आहे व या विषयावर आपण मार्गदर्शन पर तासिकेचे नियोजन केले पाहिजे हे लक्षात आले,त्यांनी शाळेत महिला मेळाव्या सह किशोरींचा मेळावा घेतला त्यात लेडीज डॉक्टरांना आमंत्रित केले.डॉक्टरांनी  किशोरींना मासिक पाळी,आरोग्य,स्वच्छता,आहार या बाबत स्क्रीनवर पी.पी.टी.च्या साह्याने मार्गदर्शन केले.महिलांनाही त्यांच्या आरोग्यविषयक सवयी जाणून घेवून मार्गदर्शन केले.
सर्व किशोरी त्यानंतर फुलू लागल्या ,डुलू लागल्या,फुलपाखराप्रमाणे स्वच्छंद वावरु लागल्या,मोकळा श्वास घेऊ लागल्या.


सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

No comments:

Post a Comment