Wednesday 26 February 2020

माय मराठी

*मराठी राजभाषा दिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!*

    माय मराठी

माझ्या मराठी मातीत
शब्द पिक अंकुरते
रानोमाळी ती फुलते
रास शब्दांची भरते...

            कधी बोलते वृत्तात
            कधी अंलकारी होते
            ओव्या भारुडे मांडते
            किर्ती अभंगात गाते...

घेते निसर्ग कुशीत
पान,फुलांशी बोलते
शब्द सरीत भिजते
प्रेम सागरी डुंबते...

           वाणी तुकोबांची होते
           वेद ज्ञानाचे वदते
           भाव मनीचे खोलते
           अंतराचे दुःख नेते...

गोडी मराठी मायेची
माणूसकी ही जपते
वाट प्रेमाची दाविते
मान मराठीस देते.....


सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार

Sunday 23 February 2020

कविता- शब्दच कुठे उरतात....

शब्दच कुठे उरतात...

शब्दच कुठे उरतात गीतात तिला मांडतांना
शब्द कुठे उरतात व्यथेस तिच्या सांगतांना

नसती ती जर जग हे सुंदर पाहिले नसते
नसती ती तर जीवन माझे फुलले नसते

उपाशी राहुनी दिला आम्हा मुखी घास
रात्र रात्र जागुन तिने भोगला खूप त्रास

खडतर जीवन जगतांनाही हसत राही
आयुष्याचे गणित एकटी सोडून पाही

शब्दच कुठे उरतात तिला स्मरतांनाही
संस्काराची ओंजळ रिती भरतांनाही

सौ.जया नेरे

Thursday 20 February 2020

कविता- शिवमुनी

महाशिवरात्रीच्या सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा...!     

शिवमुनी
करूनी सुखाचा त्याग
फिरलास रानोमाळ
फासुनी भस्म अंगाला
घातली नागोबांची माळ

अंगार मनाचा दूर करण्या
शिरावर वाहते गंगामाय
वल्कलांनी झाकली काया
मनात कुठला हव्यास नाय

अमृताचे करूनी दान
विषास स्वतः केले प्राशन
मंत्र दिधला जगण्याचा
ठेवावे नित्य संयमी मन

आली संकटे किती जरी
हार ना मानावी कुणी
पचवावे अपयशास सदा
सांगे सर्वास हा शिव मुनी

सौ.जया नेरे

Tuesday 18 February 2020

काव्यरचना - शिवबा


शिवबा
स्मरावा शिवबा
घडावा शिवबा
जगावा शिवबा
गावा ही शिवबा
किल्ला शिवनेरी
जन्मला शिवबा
दिले असे रत्न
जिजा माँ साहेबा
ऐकविल्या कथा
स्वप्न जागविले
युध्दनितीचे ते
धडे गिरविले
मावळे सोबती
लढला गनिमी
घेतली तयांनी
स्वराज्याची हमी
तरबेज बुध्दी
करारी तो बाणा
शिस्त रयतेला
शत्रूस निशाणा
यावे पुन्हा जन्मा
नांदावी समता
द्यावी शिकवण
मिटावी शत्रूता

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार

बघा शिवबा होता येतय का ?- काव्यरचना

बघा शिवबा होता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर शिवबाचे विचार स्विकारा
त्यांचे आचार अंगिकारा
शिवमय होऊ द्या देह सारा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर प्रत्येक नारीचा सन्मान करा
तिच्या रक्षणाची जबाबदारी स्विकारा
अत्याचारापासून तिला मुक्त करा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर समता मनामनात ठसवा
प्रत्येक जनमाणसात समानता रुजवा
मतभेदांचे काहूर विझवा
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

खरचं शिवबाचा आदर करताय
तर स्वराज्य रक्षणाचा विडा उचला
जसा माझ्या शिवबाने इतिहास रचला
गनिमीने शत्रूवर वचक बसला
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

घराघरात शिवबा झाला पाहिजे
वाईटाचा नाश केलाच पाहिजे
भारतमातेस न्याय दिला पाहिजे
बघा शिवबा होऊन जगता येतय का?

निळा,पिवळा,हिरवा,भगवा
याचे मर्म तुम्ही जाना
त्यांचे विचार आचारणात आणा
तेव्हाच यांचा तुम्ही जयजयकार म्हणा
बघा शिवबा होऊन जगता येतेय का?

जय भवानी,जय शिवराय...!

सौ.जया नेरे

Thursday 13 February 2020

कविता- भारतमाता रडते आहे.....पुलवामा हल्ला



भारतमाता रडते आहे

विपरीत सारे घडते आहे
बघून भारत माता रडते आहे...

सुरक्षेसाठी झगडत असता
बलिदान वीरांचे होते आहे
बघून भारत माता रडते आहे....

दुश्मनांना कसा ना पाझर फुटला
चित्कारांनी आसमंत फुटते आहे
बघुन भारत माता रडते आहे....

घर संसार आणि सारेच लुटले
प्रत्येकाचे काळीज तुटते आहे
बघुन भारत माता रडते आहे.....

हे माते तुझ्या वीर सुपूतांचे रक्त
तुझ्याच शिरावर उडते आहे
बघून भारत माता रडते आहे....

छिन्नविछिन्न हे शरीर तयांचे
यातनांनी कसे तडफडते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

निष्पाप जिवांची होळी केली
पाहुनी हृदय हे जळते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

माणुसकीशी आपुले नाते
तेच तर आता नडते आहे
बघून भारतमाता रडते आहे....

चिरडून टाक तू दुश्मनांस या
कशास आता डगमगते आहे
बघून भारतमाता रडते आहे...

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार


Wednesday 12 February 2020

बालकविता- रानमेवा

रानमेवा

स्नेहा आणि सुमित
खुशीत होती आज
कारण जाणार होती
त्यांची सहल जंगलात

निघाले सारेच मुलं
जंगलाच्या वाटेने
चिंचा,बोर,आवळे
दिसली रस्त्याच्या कडेने

दगड आणि काठ्यांनी
सगळ्यांची केली शिकार
चटक मटक खाल्ले
झाला जीव गारे गार

पुढे दिसले झाड
हिरव्या लाल आकड्यांचे
अरे ही तर इंग्रजी चिंच
लक्ष गेले सगळ्यांचे

जांभुळ आणि करवंदांची
दिसली त्यांना जाळी
खायचे होते सगळ्यांना
रानाची ही मैना काळी

रानमेवा खाण्यात तर
होते सारेच धुंद
याहून दुसरा नाही
जगण्यातील आनंद

सौ.जया नेरे

Monday 10 February 2020

बालकविता- टेडिबिअर


टेडिबिअर

खेळण्यासाठी हवा
टेडिबिअर नवा
आई बाबा आणि मी
दुजा कुणी हवा

अॉफिस जातात बाबा
आई जाते कामाला
एकटीच असते घरात
नसते कुणी बोलायला

झोपतांनाही माझ्यासोबत
टेडिबिअर असतो
अंगाईचा सूर मग
त्याच्या कानी वाजतो

त्याच्या शिवाय कधी माझे
जेवण होत नाही
बसतो दोघ गपशप करत
वेळ सहज निघून जाई

एवढा मोठा बंगला त्यात
फक्त आम्ही दोघं
आजी बाबा काका काकू
गावी असतात चौघं

गोष्ट कुणी सांगत नाही
जेवू घालत नाही कुणी
काऊचिऊचा घास आणि
संपत चालली रूढी जुनी

टेडिबिअरच आहे केवळ
माझा दोस्त खरा
एकाकी या जीवनाचा
तोच तर आहे आसरा

सौ.जया नेरे









Sunday 9 February 2020

बालकविता-चॉकलेट


चॉकलेट
चॉकलेट आणि मुलांचे
असते गोड नाते
रडले मुल रूसले मुल
चॉकलेट हातात येते

शाळेत जातांना हट्ट होतो
चॉकलेटसाठी खास
बाबा म्हणतात चॉकलेट देईन
झालास जर पास

चॉकलेटचा डब्बा जेव्हा
येतो चिंटूच्या घरी
आली असेल नक्कीच आता
आजी आजोबांची फेरी

वाढदिवसाला चॉकलेटची
असते मेजवाणी
प्रत्येक जण येतांना
चॉकलेट घरी आणी

चॉकलेटने दात किडतात
म्हणतात डॉक्टर अंकल
चॉकलेट खाण्यासाठी मग
लढवू कोणती शक्कल

कॕडबरी तर आहे बघा
चॉकलेटची माय
यासाठीच तर चॉकलेट डे
प्रिय झाला हाय

सौ.जया नेरे





Wednesday 5 February 2020

बालकविता- प्राण्यांची सहल

सहल
जंगलातील प्राण्यांची जाणार होती सहल
कुठे आणि कसे जायचे करत बसले खल

समुद्राच्या सफरीचे केले त्यांनी नियोजन
प्रत्येकाने वाटून घेतले आणायचे भोजन

मुळा,गाजर,शेंगा,बोरे सर्वांनीच जमवले
जो तो जागा सांभाळत बोटीवर जाऊन बसले

मोराच्या तालावर हत्तीदादा नाचत होते
ससा आणि कासव तबलापेटी वाजवत होते

गार गार पाण्याने भरली सा-यांना थंडी
कुडकुड करत सर्वांनी घातली अंगावर बंडी

आणलेल्या भोजनावर मारला त्यांनी ताव
कळत नव्हते कुणालाही चालतेय कशी नाव

समुद्रातील सहलीने मने त्यांची आनंदली
भांडणतंटा विसरून मौजमस्तीत दंगली

सौ.जया नेरे