Thursday, 23 April 2020

बालकविता- वेडा आंबा

वेडा आंबा
आंब्याच्या झाडावर
होते आंबे सात
त्यातील एकाशी कुणी
करत नव्हते बात

एकटाच बसायचा
एकटाच खेळायचा
इकडे नि तिकडे
एकटाच पळायचा

स्वभावाने वेंधळा
होता जरा बावळा
सर्वांमध्ये होता तो
थोडाफार वेगळा

रंग नाही रूप नाही
होता वेडा वाकडा
डोळे होते तिरळे
होता जरा जाडा

एकदा झाडावरच
लागला तो रडायला
कुणीतरी दगडाने
लागले पाडायला

राजू म्हणत होता
आईबाबा जरा थांबा
आवडला होता त्याला
वेडा तोच आंबा

वेडा आंबा आज होता
खूपच खुशीत
कारण जावून बसला तो
राजूच्या कुशीत

सौ.जया नेरे

No comments:

Post a Comment