Wednesday 6 May 2020

बालकविता- नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी

नकोशी झाली सुट्टी
आला मला कंटाळा
मुलांनी गजबजलेली
आठवते मला शाळा

अंक आणि अक्षरांचा
भरलेला तो फळा
पुस्तकांच्या संगतीने
लागे वाचनाचा लळा

काळ्याशार फळ्यावर
पांढऱ्या खडूची संगत
मधल्या सुटीत बसलेली
आठवतेय मला पंगत

घंटेची ती किणकिण
प्रार्थनेची सुंदर धुन
ऐकाविशी वाटतेय मला
ती गाण्यांची गुणगुण

कधीपासून मित्रांसोबत
रंगला नाही खेळ
करमेच ना त्याशिवाय
जात नाही वेळ

बाईच्या प्रेमाला आज
झालो आम्ही पारखे
शाबासकीने पाठीवर
हात फिरवायच्या सारखे

डोळा चुकवून सर्वांचा
शाळेत जाऊन यावे
वाटे एकदा तरी तिला
डोळेभरून पहावे

सौ.जया नेरे
नवापूर

No comments:

Post a Comment