Wednesday 23 October 2019

एक पणती व्यसनमुक्तीची

27 अॉक्टोबर 2019
पेटवू या सर्वांनी आपुल्या दारी
एक पणती व्यसनमुक्तीची
सुख समृध्दी हासत येईल
आपुल्या घरी

एक पणती व्यसनमुक्तीची

होऊ नकोस रे खुळा
का करशी तू
जीवनाची होळी
एक पणती व्यसनमुक्तीची
लावून करशील ना
यंदाची दिवाळी
भर जीवनी आनंद
नको व्यसनांचा छंद
आयुष्य आहे किती कमी
कुठे आहे जगण्याची हमी
मनुष्य जन्म मिळणे कठीण
का करतोस अशी वाताहात
मिणमिणत्या पणतीला
देवून बघ आधाराचा हात
संसार रूपी सुंदर बागेचा
आहेस तू माळी
लेकरांसह स्वतः फुलण्यासाठी तरी
सुखी जीवनाची ऐक ना
एकदा आरोळी
तुझ्या दारी नांदावी समृध्दी
प्रगतीत तुझ्या व्हावी वृद्धी
म्हणून तरी एक पणती
व्यसनमुक्तीची लावून
करशील ना
यंदाची दिवाळी
तुझे मित्र तुला म्हणणार
नाहीत कधी
सोड तू दारू,तंबाखू
अन् बीडी
पण वेड्या समजदार
असून ही का लावतोय
आपल्या संसाराला
जाळणारी काडी
मन घट्ट कर
बायको,मुलांच्या प्रतिमा
डोळ्यासमोर धर
दिसू दे कुंकूम तिलक
तिच्या भाळी
केविलवाण्या चेहऱ्यांकडे
पाहून तरी
एक पणती व्यसनमुक्तीची
लावून करशील ना
यंदाची दिवाळी...

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Tuesday 22 October 2019

बालगीत रचना-पक्ष्यांची शाळा


दिव्यमराठीत प्रकाशित बालरचना-
बालगीत
पक्ष्यांची शाळा

वडाच्या पारावर भरली पक्ष्यांची शाळा
कोंबडा आरवताच सारे झाले तिथे गोळा

आठवड्याच्या तासिकांनी भरला मग फळा
लागला पाहिजे सगळ्यांनाच शाळेचा लळा

सारेच ओरडले गुरुजींना रविवार तरी टाळा
नाहीतर येईल बघा सा-यांनाच कंटाळा

शाळेचे नियम सर्वांनी आठवणीने पाळा
चुकणार नाही कधीही अभ्यासाचा ताळा

चिऊताईने राजासाठी आणली फुलांची माळा
मोराला मग माळ घालण्या आला कबुतर भोळा

प्रार्थना म्हटली कोकीळेने काढून सुंदर गळा
गोष्ट सांगण्या उभा राहिला मधोमध कावळा

शाळेत येण्या पक्ष्यांचा मग जमला गोतावळा
गाणी गोष्टी सारेच झाले सुटली आता शाळा

सौ.जया नेरे
9423918363

स्थानिक आदिवासी बोलीभाषेतील बालगीत रचना-

बदलीने नवीन शाळा या शाळेतील
शाळेच्या प्रथमदिनी स्थानिक बोलीभाषेतून शाळेत येण्यासाठी विद्यार्थ्यांना आव्हान करणारे गीत मी स्वतः लेखन करण्याचा प्रयत्न केलाय.....!

*चाला शाला मे*

चाल वा प्रियू,चाल वा खूशी
आपू शाला में जाहूँ....
शालामें जाईने आपू
खूप खूप हिकहूँ....

चाल रा साहिल,चाल रा सुमित
आपू शाला में जाहूँ....
शाला में जाईने आपू
गाणे बी आखहूँ

चाल वा स्नेहा,चाल वा तमन्ना
आपू शाला में जाहूँ
शाला में जाईने आपू
खूप खूप नाचहूँ

चाल वा प्रियू,चाल वा खूशी
आपू शाला में जाहूँ
शाला में जाईने आपू
चित्रे बी काढहूँ

चाल रा स्नेहल,चाल रा साहिल
आपू शाला में जाहूँ
शाला में जाईने आपू
चित्राम रंग बी भरहूँ

चाल वा स्नेहा,चाल वा खूशी
आपू शाला में जाहूँ
शाला में जाईने आपू
गणिते बी केहहूँ

सौ.जया नेरे
जि.प.शाळा,रायंगण(बंधारफळी)

कविता-फटाकेमुक्त दिवाळी

फटाके मुक्त दिवाळी

फटाके मुक्त दिवाळीचे
नाही आम्हास देणं घेणं
कुठ समजतयं हो आम्हाला
धूर प्रदुषणाचं असणं.....

बालके आहोत आम्ही
राहू द्या आम्हास स्वच्छंद
जिथे मनास मिळतो आनंद
तिथेच असतो कायम बंद....

असते कशी दिवाळी?
कुठ कळतयं आम्हाला
नव्या कपड्यांची तर
सवयच नाही हो या जिवाला....

उटणं तेल तर जावूच द्या
इथे साबणही नसतो
जमवतो गोडधोड कुठून तरी
औक्षण तिलक तर दूरच असतो

कच-याच्या ढिगा-यात शोधतोय
अर्धवट जळलेल्या फटाक्यांना
तेच पेटविण्यात मिळवितो आनंद
हळूच पूसतोय आपल्या अश्रूंना

सौ.जया नेरे
नवापुर जि.नंदुरबार