Friday 20 December 2019

कविता- संत गाडगेबाबा

संत गाडगेबाबा

साधी होती राहणी
होते उच्च विचार
अशिक्षित होते जरी
केला शिक्षणाचा प्रचार

समाज सुधारणेचे व्रत
बाळगले नित्य मनी
वैज्ञानिक दृष्टीचे बीज
पेरले ज्यांनी जीवनी

हाती खराटा घेऊन
स्वच्छ केले जग सारे
अंधश्रध्दा निर्मुलनाचे
वाही किर्तनात वारे

देवकीनंदन गोपालाची
चाले धुन जागोजागी
पशुहत्येचा विरोधी
असा हा महान जोगी

संसाराचा केला त्याग
चित्त लागे ना  सदनी
गोरगरिबांच्या सेवेचे
तेज पसरलेय वदनी

अनाथालय न् धर्मशाळातील
मनामनांचा आधार झाला
सखुबाईंच्या उदरी असा हा
तेजोःपुंज पुत्र जन्मला

असा संत होऊन गेला
जगी सत्कर्म ठेवून
मानवतेचा मंत्र खरा हा
गेला जनमाणसात देवून

✍🏻सौ.जया नेरे

Wednesday 4 December 2019

बालकाव्य रचना-परी

कोण बरी?
रोज रात्री स्वप्नामध्ये
येते माझ्या घरी
पांढऱ्या शुभ्र रंगाची ही
कोण आहे बरी?

इवले इवले पंख तिचे
दिसतात किती छान
इकडून तिकडे उडतांना
हरवते तिचे भान

पान फुलांशी खेळायला
ती रोज येते बागेत
मऊ मऊ गालीच्यावर
खेळत असते मजेत

हातात असते तिच्या
जादूची एक  छडी
लहान मुलांची आहे
तिला फार गोडी

आहे कोण ही खरी?
राहते चांदोबाच्या घरी
सुंदर सुंदर दिसणारी
अरे ! ही तर आपली सोन परी

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363