Friday 17 January 2020

कविता-रानप-या

रानप-या
रानावनात राहणाऱ्या
माती चिखलात खेळणा-या
काटेकुटे तुडवणा-या
आहोत आम्ही रानप-या

लागत नाही आम्हास
थंडी ऊन वारा
झेलतो अंगावर
पावसाचा मारा
देह तापतो चटक्यांनी सारा
अशा आहोत आम्ही
रानावनात राहणाऱ्या रानप-या

तेलकट तिखटाचा नसतो
जेवणात मारा
तुकतुकीत कांतीचा असतो
आमचा चेहरा
स्नो,पावडरला नसतो
कुठेही थारा
अशा आहोत आम्ही
रानावनात राहणाऱ्या रानप-या

काटक,संयमी
अशी आमची ख्याती
खेळण्यात तरबेज
चपळतेची आमची महती
थकत नाही,झुकत नाही
निर्मलतेचा आमच्यात
वाहतो झरा
अशा आहोत आम्ही
रानात राहणाऱ्या रानप-या


सौ.जया नेरे

बालकविता-कडाक्याची थंडी



कडाक्याची थंडी
जंगलात पडली कडाक्याची थंडी
कोल्होबाने घातली लोकरी बंडी
वाघोबाने ओढली कश्मिरी शाल
माकडाचे तर झाले पुरते हाल
मोराने सप्तरंगी ओढली रजई
बगळ्याने कापसाची घेतली दुलई
हत्तीने घातला काळाकुट्ट कोट
सश्याचे तर सगळे फुटले ओठ
जंगलाचा कारभार करणार कसा?
थंडीत प्रत्येकाचा बसला होता घसा
शेकोटीभोवती सारे बसले येवून
तिथेच सभेचे विषय टाकले घेवून
थंडी जाण्याची पाहू लागले वाट
जाणार कधी ही हुडहुडीची लाट
सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

Wednesday 15 January 2020

बालकविता-तिळगुळ

तिळगुळ

तिळाची आणि गुळाची
झाली आता मैत्री
लोळले पोळले खेळलेत
कढईत रात्री

शेंगदाण्याने मारली
कढईत उडी
गडबडा लोळून छान
तयार झाली पापडी

चिंटूचे तर सारेच आता
स्वयंपाक घरात लक्ष
डबा वाजणार नाही
यासाठी रहावे का दक्ष?

गुळाच्या खमंग वासाने
परिसर दळवळला
प्रत्येकालाच लाडू मग
खावासा वाटला

तीळ आणि गुळाचे
थंडीशी आहे नाते
स्नेह आणि माधुरता
नात्यात टिकवू पहाते

भांडण तंटा नकोच
प्रेम हृदयात साठवू या
भेदभाव विसरून सारे
क्षण सुखाचे आठवू या

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार
9423918363

कविता-तिळगुळ

तिळगुळ

तीळ आणि गुळाची
होते जेव्हा भेट
विसरून जातात भांडण सारे
होते तयात समेट

स्निग्ध अन् माधुर्याचा
होतो येथे मेळ
नात्यातील जवळीकतेची
हीच तर असते वेळ

प्रेमाची उधळण करत
येत असतो तीळ
मनामनात नसतो त्यांच्या
तिढा आणि पीळ

तिळगुळाचा वाण
देऊ संक्रात सणाला
कटु आठवांना सारून
गोडवा येईल मनाला

नववर्षातील पहिला सण
मान तुला हा पहिला
सद्गुणांचा अमोल ठेवा
युगानुयुगे चालत राहिला

सौ.जया नेरे

Saturday 11 January 2020

बालकविता-पतंग

पतंग

रंगीबेरंगी पतंगांनी
भरले होते आकाश
आकाशातील सूर्याचा
झाकला गेला प्रकाश

सूर्यालाही कळले नाही
नेमके काय झाले
पतंगांच्या रंगानी तर
आभाळ पूर्ण न्हाले

हळूच त्यातून एक लाल
पतंग बोलू लागले
शर्यतीचा त्यांचा बेत
सूर्यास खोलू लागले

सूर्य आणि त्यांचा आता
बसला छान मेळ
आपसातील शर्यतीचा
मग सुरू झाला खेळ

कोण जिंकेल कोण हरेल
सारे बोलू लागले
पाखरांच्या गाण्यावर
तालात डोलू लागले

पतंगांना साथ देण्या
वारा तिथे आला
झाड वेलींनी तर
फांद्यांचा टाळ केला

पतंगांनी वाढवली होती
आकाशाची शोभा
सूर्यालाही कळले नाही
संपली कधी प्रभा

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार