Saturday, 11 January 2020

बालकविता-पतंग

पतंग

रंगीबेरंगी पतंगांनी
भरले होते आकाश
आकाशातील सूर्याचा
झाकला गेला प्रकाश

सूर्यालाही कळले नाही
नेमके काय झाले
पतंगांच्या रंगानी तर
आभाळ पूर्ण न्हाले

हळूच त्यातून एक लाल
पतंग बोलू लागले
शर्यतीचा त्यांचा बेत
सूर्यास खोलू लागले

सूर्य आणि त्यांचा आता
बसला छान मेळ
आपसातील शर्यतीचा
मग सुरू झाला खेळ

कोण जिंकेल कोण हरेल
सारे बोलू लागले
पाखरांच्या गाण्यावर
तालात डोलू लागले

पतंगांना साथ देण्या
वारा तिथे आला
झाड वेलींनी तर
फांद्यांचा टाळ केला

पतंगांनी वाढवली होती
आकाशाची शोभा
सूर्यालाही कळले नाही
संपली कधी प्रभा

सौ.जया नेरे
नवापूर जि.नंदुरबार

No comments:

Post a Comment